यावल शहरातील स्मशानभूमीतील लाईट, स्वच्छता व धुर फवारणीबाबत मनसेकडून निवेदन

यावल न्युज

यावल शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अंधारात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच शहरात डासांमुळे साथीचे आजार वाढत असल्याने धुर फवारणीचे तातडीने नियोजन करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद यावल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात मनसेचे राज्य उपाध्यक्ष (जनहित विधी विभाग) चेतन दिलीप अढळकर यांनी म्हटले आहे की, यावल शहरातील व्यास मंदिराच्या मागे असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत केवळ एकच हायमास्ट लाईट असून, संध्याकाळच्या वेळेस प्रकाशाची अत्यंत अडचण निर्माण होते. त्यामुळे स्मशानभूमीत लाईटची योग्य व्यवस्था करून नियमित स्वच्छतेची देखभाल करावी.

तसेच, शहरातील नाले सफाई अपूर्ण असून काही ठिकाणी अस्वच्छता कायम आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. याला प्रतिबंध करण्यासाठी शहरात सकाळी धुरळणी व सायंकाळी धुर फवारणी असे नियमित नियोजन वार्डनिहाय राबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने