यावल न्युज
यावल पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मोठी कारवाई करत ३ लाख ६३ हजार रुपयांचा गांजासह होंडा सिटी कार जप्त केली आहे. या प्रकरणी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
यावल पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. किनगाव-चुंचाळे रोडवरील इंदिरानगर परिसरातील एका दर्ग्याजवळ पोलीसांनी सापळा रचत एका होंडा सिटी कार (क्रमांक MH-01-BB-1407) ला थांबवले.
पोलीस पथकात पोउनि अस्लम खान, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हेड कॉन्स्टेबल वासुदेव मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पवार, अमित तडवी, मोहन तायडे, एजाज गवळी, व सागर कोळी यांचा समावेश होता.
गाडीची तपासणी केली असता डिकीत एकूण ६.३३ किलो गांजा सापडला. त्यात:
एका प्लॅस्टिक बॅगमध्ये १.७९ किलो गांजा (मूल्य – १०,००० रु.)
सेलोटेपने गुंडाळलेल्या प्लॅस्टिकच्या पॅकमध्ये ५.२५४ किलो गांजा (मूल्य – ५३,००० रु.)
या गांजाची एकूण किंमत ६३ हजार रुपये, तर जप्त गाडीची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे.
रोनक रुबाब तडवी (रा. कुसुंबा, ता. रावेर) याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. आर्थिक फायद्यासाठी गांजाची चोरट्या मार्गाने विक्री करत असताना तो सापडला.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.