यावल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती

यावल न्युज
 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यावल बस स्थानक परिसरात पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. "माझे झाड, माझी जबाबदारी" या संकल्पनेतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्यातून नागरिकांना पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश दिला गेला. प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच पर्यावरणाच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडले पाहिजे, वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्ती अशा उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रबोधन करण्यात आले. "फक्त झाडे लावू नयेत, तर त्यांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे", हा मोलाचा संदेश यामध्ये देण्यात आला.

हे पथनाट्य सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक डॉ. नरेंद्र महाले यांनी लिहिले असून, त्यांनी स्वतःही सादरीकरणात सहभाग घेतला. त्यांच्या सोबत संचित कोळी महाराज व यश वारके यांनी देखील प्रभावी भूमिका साकारल्या. या कार्यक्रमाला यावल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे आयोजन जागरण गटाचे तालुका प्रमुख दिनकर क्षीरसागर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. प्रभू जाधव, सलील महाजन, नितीन महाजन, राकेश कोलते, भरत महाजन, डॉ. धीरज चौधरी, डॉ. पुरुषोत्तम ठोंबरे, हिमांशू पाटील, घारू दादा, आगार व्यवस्थापक व एस. टी. कर्मचाऱ्यांचे या कार्यक्रमासाठी विशेष योगदान लाभले.

कार्यक्रमानंतर बस स्थानक परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी झाली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने