दुर्दैवी घटना: कोरपावली येथे शेळी वाचवताना तरुणाचा मृत्यू

यावल न्युज : कोरपावली ता. यावल 

Youth dies in Korpavali कोरपावली येथील जयेश महाजन (वय १८ वर्षे), हा गरीब कुटुंबातील युवक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांचा व्यवसाय करत होता. आज सायंकाळी सुमारे ७:३० वाजता गावाच्या बाहेर असलेल्या सांडपाणी खड्ड्यात त्याच्या एका शेळीचा पाय घसरून पडला.


आपली शेळी वाचवण्यासाठी जयेश खड्ड्यात उतरला असता त्याचा पाय घसरून तो गाळात अडकला. ग्रामस्थांनी तातडीने मदतीला धाव घेत जयेशला खड्ड्यातून बाहेर काढून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. जयेश हा अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचा युवक होता. त्याच्या अचानक निधनाने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची नोंद यावल पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने