एकनाथ शिंदे यांच्या विमानात नाट्यमय घडामोडी – पायलटने उड्डाणास दिला नकार, ४५ मिनिटांचा ड्रामा

यावल न्युज : जळगाव 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुक्ताईनगर दौरा आटोपून ते मुंबईसाठी रवाना होण्यासाठी जळगाव विमानतळावर पोहोचले. मात्र तिथे एक अनपेक्षित प्रकार घडला. विमानाचे पायलट तब्येतीच्या कारणाने थेट उड्डाण करण्यास नकार दिल्याने विमानतळावर सुमारे ४५ मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार सर्वजण विमानात जाण्यास सज्ज होते, पण पायलटने सलग १२ तास ड्युटी केल्यामुळे थकवा व प्रकृतीच्या कारणास्तव विमान उडवण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण ताफा विमानतळावरच अडकला.

पायलटची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी प्रयत्न केले. नंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनीही पायलटशी संवाद साधून त्याला समजावले. याचदरम्यान वैद्यकीय पथकही बोलावण्यात आले व पायलटची तपासणी करण्यात आली.

या सर्व गोंधळानंतर विमान कंपनीनेही हस्तक्षेप करून पायलटशी संपर्क साधला. अखेर ४५ मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर पायलटने विमान उडवण्यास संमती दिली. त्यानंतर शिंदे यांचे विमान मुंबईकडे रवाना झाले.

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “पायलटनं प्रकृतीचं कारण दिलं. त्याच्यावर दबाव न आणता कंपनीमार्फत समजूत घालण्यात आली. तांत्रिक बाबींचाही विचार करण्यात आला.”

या नाट्यमय घडामोडींमुळे काही काळासाठी जळगाव विमानतळावर मोठी हलचल निर्माण झाली होती. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत अखेर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं विमान सुरक्षितरित्या मुंबईकडे रवाना झालं.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने