यावल न्यूज : हर्षल आंबेकर
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत यावल पंचायत समितीमध्ये तालुका स्तरीय तक्रार निवारण सभेचे आयोजन सोमवार, दिनांक २३ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे.
या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून नागरिकांच्या अडचणी व तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झाल्यापासून करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत गतिमानता येण्यासाठी अनेक उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “जिल्हा परिषद आपल्या दारी”, ज्याद्वारे नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत वारंवार जावे लागणार नाही. त्यामुळे वेळ, पैसा वाचणार असून अनावश्यक मनस्ताप टाळता येणार आहे.
या तक्रार निवारण सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार व भाऊसाहेब अकलाडे, बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, समाजकल्याण अधिकारी विनोद चावरिया, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या संधीचा लाभ घेऊन आपल्या अडचणी आणि तक्रारी थेट अधिकाऱ्यांपुढे मांडाव्यात आणि त्याचे त्वरित निवारण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी केले आहे.