यावल न्युज
यावल तालुक्यातील साकळी महसूल मंडळात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने धडक कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करून यावल तहसील कार्यालयात जमा केले आहे. ही कारवाई शुक्रवार, दि. ६ जून २०२५ रोजी करण्यात आली असून, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थोरगव्हाण-पिळोदे रस्त्यावर अवैध वाळूची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर सापडले. या ट्रॅक्टरवर साकळी भाग मंडळ अधिकारी सचिन जगताप, महसूल सेवक गणेश महाजन, मनवेलचे महसूल सेवक विजय भालेराव, तसेच न्हावी प्र. अडावद (यावल) येथील महसूल सेवक विकास सोळंके यांनी संयुक्त कारवाई केली.
सदर जप्त ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. या कारवाईदरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिगावचे ग्राम महसूल अधिकारी मिलिंद कुरकुरे, सातोदचे ग्राम महसूल अधिकारी कुंभार आप्पा, तसेच दहिगावचे महसूल सेवक विजय साळवे, रामा कोळी, अरविंद बोरसे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अवैध वाळू वाहतूक ही शासनाच्या महसुलावर थेट गदा आणणारी बाब असून, अशा प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाने ही कारवाई केली आहे.