यावल न्युज
Ration card verification राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सुरू केलेल्या अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेचा भाग म्हणून यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्यात आली. गावातील अपात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिकेच्या आधारे चौकशी करण्यात आली असून, काही प्रकरणांमध्ये पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांत अपात्र कुटुंबांकडून शिधापत्रिकेचा गैरवापर केल्याच्या तक्रारी आल्यामुळे संपूर्ण राज्यात जिल्ह्यात तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सांगवी बुद्रुकमध्ये तलाठी राजू गोरटे व महसुल सेवक सागर तायडे यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम पार पडली.
राज्य सरकारच्या आदेशानुसार, चारचाकी वाहने, सरकारी नोकरदार व जास्त उत्पन्न असणाऱ्यांनी शिधापत्रिका सरेंडर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेअंतर्गत स्वयंघोषणा पत्रे भरून घेण्यात येत असून, चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, "योजनेचा लाभ फक्त पात्र कुटुंबांपर्यंतच मर्यादित राहावा, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे."
गावातील अनेक नागरिकांनी तलाठी कार्यालयाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले असून, पारदर्शक तपासणी आणि सहकार्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. "ही मोहीम गरजूंना न्याय देणारी असून, प्रशासनाचा विश्वास वाढवणारी आहे," अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून मिळत आहेत.