यावल न्युज
रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामात लागणाऱ्या युरिया व डीएपी या अत्यावश्यक खतांचा तीव्र तुटवडा भासत आहे. लिंकिंग प्रणालीमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत खत मिळत नसल्याने शेतीच्या कामांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर रावेरचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आणि राज्याचे कृषी मंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करत नॉन-लिंकिंग युरिया व डीएपी खत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, रावेर-यावल मतदारसंघासाठी उद्या ‘बफर स्टॉक’मधून खताचा साठा अधिकृतपणे रिलीज होणार आहे.
आ. जावळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेवर शासनाच्या निदर्शनास आणून देत प्रभावी पद्धतीने हा प्रश्न मांडला. खताचा साठा रिलीज होत असल्यामुळे लिंकिंग नसलेल्या शेतकऱ्यांनाही युरिया व डीएपी खत सहज उपलब्ध होणार आहे, आणि त्यामुळे खरीप हंगामाचे नुकसान टळण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट असून, अनेकांनी आमदार अमोलभाऊ जावळेंच्या तात्काळ कृतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.