जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रमात अनागोंदी – गटविकास अधिकाऱ्यांवर नाराजीचा सुर

यावल न्यूज
दिनांक २३ जून रोजी यावल येथे "जिल्हा परिषद आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत आयोजित तक्रार निवारण सभा चर्चेचा विषय ठरली. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, रावेरचे आमदार अमोलदादा जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. मात्र, सभेचे अपुरे नियोजन, प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्याचा प्रयत्न व गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
सभेच्या सुरूवातीसच नागरिकांनी घरकुल अनुदान, गोठा योजनेसह विविध प्रलंबित प्रकरणांबाबत जोरदार तक्रारी मांडल्या. त्यात गटविकास अधिकारी कार्यालयात नागरिकांना भेटत नसल्याच्या तक्रारी विशेषत्वाने समोर आल्या. परिणामी आमदारांनी गटविकास अधिकारी यांना सभेतच खडे बोल सुनावले. तब्बल ३ हजार घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळालेला नाही, यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही नाराजी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे, गटविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सभेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांची माहिती प्रसारमाध्यमांमार्फत कधीच जनतेपर्यंत पोहोचवलेली नाही, असा आरोप प्रतिनिधींनी केला. त्यामुळे उपस्थित पत्रकारांनीही निषेध व्यक्त केला.

या गोंधळात चोपडा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत प्रशासनाच्या कारभाराचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, सभागृह अपुरे असल्याने अनेक तक्रारदारांना बाहेर थांबावे लागले.

सभेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, संचालक सूर्यभान पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष यांच्यासह सरपंच, सदस्य, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक गटविकास अधिकारी यांनी केले.

यावल गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्यावर याआधीही नियोजनातील त्रुटींबाबत सभांमध्ये टीका झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासन, वरिष्ठ अधिकारी व जनतेची दिशाभूल होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने