शिवसेनेच्या वतीने शहरातील समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

यावल न्युज : भरत कोळी
 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यावल शहरातील विविध नागरी समस्या लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनास निवेदन व स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष भेट घेऊन मुख्याधिकारी श्री. गवई यांच्यासह संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.


या निवेदनात खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे

1. बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्त्याची दुरुस्ती – यापूर्वीही यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. सदर रस्ता मंजूर असूनही अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून चिखल व खड्डे यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.


2. नालेसफाईचे अपूर्ण काम पूर्ण करावे – मेन रोडवरील नालेसफाई अपूर्ण आहे. विशेषतः म्हसोबा मंदिर ते बोरावल गेट, चोपडा रोड ते बसस्थानक, भुसावळ टी पॉइंट ते भुसावळ रोड या ठिकाणचे नालेसफाईचे काम रखडले आहे. जोरदार पावसामुळे याठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काम तातडीने पूर्ण करावे.


3. पाणीपुरवठा वेळापत्रक सुरळीत करावे – शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागांत २-३ दिवस तर काही ठिकाणी ४-५ दिवसांनंतर पाणी येते. वेळापत्रकही निश्चित नाही. त्यामुळे महिलांना व कामावर जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्व नळधारकांकडून सारखीच पाणीपट्टी आकारली जात असताना पाण्याचा भेदभाव होऊ नये, अशी नागरिकांची मागणी आहे.


4. साफसफाई आणि खड्डे बुजविण्याची मागणी – पांडुरंग सराफ नगर भागात खोल खड्डा चारी बुजवण्याची गरज असून शहरातील स्वच्छतेबाबत अधिक काटेकोर कार्यवाही करावी, अशी मागणी झाली.



या निवेदनप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यावल शहराचे जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, माजी तालुका प्रमुख कडू पाटील, संघटक पप्पू जोशी, शहर उपप्रमुख संतोष धोबी, योगेश राजपूत, विभागप्रमुख प्रकाश वाघ, हुसेन तडवी, योगेश चौधरी, विजय पंडित कुंभार, पिंटू कुंभार, सारंग बेहेडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने