यावल येथे बारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

यावल न्युज
समस्त बारी समाज यावल तालुका यांच्या सहकार्याने दि. २२ जून २०२५ रोजी यावल शहरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील बांधकाम व्यावसायिक अनिल पाटील यांच्या 'सुमाई हॉल' येथे आयोजित या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या एकूण १३२ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला, अहमदाबाद विमान दुर्घटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील दिवंगत डॉ. निलेश गणपत अस्वार यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक फौजदार अर्जुन काशिनाथ लावणे होते. अध्यक्षस्थानी नागवेलपान व्यावसायिक शिवाजी एकनाथ पाटील (भुसावळ) होते. समाज पंच मंडळाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तुकाराम रघुनाथ खलसे, माजी नगरसेवक सुनील बारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश अस्वार, शिवसेना शहरप्रमुख पंकज बारी, नितीन बारी, रितेश बारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या गौरवाबरोबरच विविध क्षेत्रातील समाजबांधवांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रगतशील शेतकरी अशोक बाबुराव अस्वार व गोपाळ बाबुराव पाटील, १०८ रूग्णवाहिका चालक प्रवीण भाऊराव भुते, सर्पमित्र नरेंद्र वंडोळे, महसूल सेविक दिपाली गारोडी (तलाठी कार्यालय, न्हावी), डाक विभागातील रेणुका दामधर (भुसावळ) यांचा समावेश होता. तसेच राज्यस्तरीय वही गायन पुरस्कार प्राप्त बाळू यशवंत पाटील, पत्रकार संतोष व संजय गारोडी यांचाही गौरव करण्यात आला.

या सोहळ्यास नाशिक येथील बारी समाज अध्यक्ष एकनाथ फकीरा आडबाल यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन प्रा. अनिल रामदास बारी (बोदवड), प्राजक्त पाटील (भुसावळ), पुंडलिक बाजीराव बारी, युवा उद्योजक पंकज बारी यांनी दिले.

साकळी, भालोद, किनगाव, न्हावी, फैजपूर येथून अनेक समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या सोहळ्याची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय नागवेली मित्र मंडळ, बारी समाज विकास मंडळ, महिला मंडळ व नागवेल बारी युवा फाउंडेशन यावल यांचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बारी, संगीता भुते, वर्षा भुते, मयुरी बारी, छाया बारी यांनी केले. शेवटी नितीन बारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने