यावल न्युज
यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतीत सरपंच गुणवंती पाटील आणि ग्रामविकास अधिकारी एस.सी. वाघमारे यांनी १५ वा वित्त आयोग आणि ग्रामनिधीतून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर आणि इतर काही सदस्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीसाठी नेमलेली अधिकृत समिती १० जून रोजी पोलीस बंदोबस्तात पाडळसे गावात दाखल झाली. समितीने वॉर्ड क्र. १ ते ५ अंतर्गत झालेली विविध विकास कामे, स्मशानभूमीत उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची पाइपलाईन आदी कामांची पाहणी करत मोजमाप केले.
याआधी ९ मे रोजीही ही चौकशी करणार होती, मात्र ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज ही चौकशी पार पडली असून, या तपासातून काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सरपंच आणि सदस्यांमधील मतभेदामुळे गावातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, फैजपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चौकशीचा अहवाल आणि पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे