Yawal Forest Newsयावल वनविभागात वन्यजीव प्रगणनेचा थरार; २७ प्रकारांचे ४९२ वन्यजीव नोंदवले

यावल न्युज
 
यावल प्रादेशिक वन विभागाच्या वतीने १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने चोपडा, रावेर आणि यावल तालुक्याच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. या प्रगणनेत वन्यप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निसर्गाच्या अद्भुत अनुभवाचा आनंद घेतला.
प्राणी गणनेसाठी विभागाच्या वतीने एकूण ३९ मचान उभारण्यात आले होते. प्रत्येक मचानावर ३ ते ४ व्यक्तींची बसण्याची सुविधा होती. या संपूर्ण उपक्रमात एकूण २७ विविध प्रजातींच्या ४९२ वन्यजीवांची नोंद घेण्यात आली.

प्रगणनेदरम्यान रानमांजर, चिंकारा, चौसिंगा, काळवीट, साळींदर, घुबड, वटवाघुळ, सातभाई, बुलबुल, बगळा, किंगफिशर, टिटवी, अजगर, रॉबीन, पानदिवड (साप) अशा अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन घडले. याशिवाय काही निसर्गप्रेमींना रावेर वनक्षेत्रात बिबट्याचे थेट दर्शन झाले, तर वैजापूर परिसरात बिबट्याचे पाऊलखुणाही आढळल्या.

या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, तहसीलदार बंडू कापसे, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वन्यजीव अभ्यासक अमन गुजर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक व संस्थांचे पदाधिकारी मिळून १५० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला.

वन्यजीव प्रगणना व निसर्ग अनुभव हा कार्यक्रम वनसंरक्षक (धुळे) श्रीमती निनु सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे व समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेनंतरही वन्यप्रेमींनी निसर्गाचे बदलते रूप अनुभवत विविध प्रजातींच्या वन्यजीवांचे निरीक्षण केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने