यावल न्युज : किरण तायडे
यावल तालुक्यात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, याकडे वन विभागाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः चितोडा-अट्रावल रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर डेरेदार वृक्षांची तोड सुरु आहे.
हे वृक्ष दिवसा ढवळ्या बिनधास्तपणे तोडले जात असून, हे सर्व प्रकार कोणी तरी शक्तिशाली व्यक्तींच्या आशीर्वादाने घडत असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वनविभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वनसंपदेची अशी उघडपणे होणारी लूट थांबवण्यासाठी तात्काळ कारवाईची गरज आहे. अन्यथा पर्यावरणाचा समतोल ढासळून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे