यावल न्युज चुंचाळे ता यावल
यावल तालुक्यातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गाशी जोडणाऱ्या चुंचाळे फाटा ते गाव रस्त्यावर दिनांक ६ मे रोजी झालेल्या तुफानी पावसात व वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळली आहेत. या झाडांमुळे संपूर्ण रस्ता अडथळाग्रस्त झाला असून, अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या झाडांची विल्हेवाट लावलेली नाही.
चुंचाळे, बोराळे, नायगाव, मालोद, आडगाव या गावांच्या दळणवळणाचा मुख्य मार्ग असलेला हा रस्ता सध्या झाडांमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. लालपरी (एसटी बस), दुचाकी, केळी वाहतूक करणारे ट्रक, बैलगाड्या आणि पायदळ प्रवासी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांनी विल्हेवाट लावण्याची मागणी सातत्याने केली असून, अजूनही ती पूर्ण झालेली नाही.
झाडे अपघातास देत आहेत निमंत्रण :
मुख्य रस्त्यावर पडलेली झाडे नव्याने येणाऱ्या वाहनांना सहज दिसत नाहीत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे झाडे मृत्यूचे निमंत्रण देत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष?
या घटनेनंतर सुपडू संदानशिव यांनी ८ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हर्षल कवीश्वर आणि वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती. मात्र विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, ही खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
"एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन हलणार का?" असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे ही स्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे गांभीर्य ओळखून झाडांची तातडीने विल्हेवाट लावावी आणि रस्ता मोकळा करावा, अशी जोरदार मागणी चुंचाळे, बोराळे परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.