यावल न्युज चुंचाळे ता यावल
तालुक्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील यावल ते चोपडा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एक अपघातासारखी परिस्थिती निर्माण झाली. चुंचाळे गावाजवळील गिरडगाव परिसरात वादळामुळे निंबाच्या झाडाची मोठी फांदी तुफानी वाऱ्यात तुटून थेट रस्त्यावर कोसळली.
घटनेच्या वेळी त्या रस्त्यावरून प्रकाश चौधरी (रा. चुंचाळे) हे आपल्या वाहनाने जात होते. अचानक फांदी समोर कोसळल्याचे लक्षात येताच त्यांनी सतर्कता दाखवत वेळीच वाहन थांबवले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या मार्गावर यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच चिंचोली गावाजवळ एका जुनाट वृक्षाचा भाग चालत्या वाहनावर कोसळून चार प्रवासी जखमी झाले होते.
गेल्या काही वर्षांत राज्य मार्गालगत अनेक वृक्ष जुने आणि कमकुवत झाले असून, अशा आपत्तींमुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने (NH) तत्काळ या मार्गावरील सर्व वृक्षांची पाहणी करून धोकादायक वृक्ष वा फांद्या छाटण्याची मागणी स्थानिक वाहनधारकांकडून जोर धरत आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांकडून होत आहे.