यावल न्यूज चुंचाळे ता यावल
यावल तालुक्यातील चुंचाळे व बोराळे शिवारात शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर चोरट्यांचा कहर वाढत चालला आहे. केबल, पाईप, स्टार्टर, ठिबकच्या नळ्या आदी शेतातील महत्त्वाचे साहित्य अज्ञात चोरांकडून दिवसेंदिवस चोरीस जात आहे. शेतकरी अक्षरशः वैतागले असून, पोलिसांची भूमिका मात्र निराशाजनक आणि उदासीन असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
अलीकडेच दहिगाव येथील उपसरपंच देवीदास धांगो पाटील आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून सुप्रीम कंपनीचे पाईप, ठिबक नळी, केबल इत्यादी साहित्य चोरट्यांनी लांबवले. त्यानंतर प्रकाश चौधरी, डिगंबर पाटील, दिनकर चौधरी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व ट्युबवेलवरील केबल्स चोरीला गेल्या आहेत.
पोलीसांच्या शेतकऱ्यांनाच उलट विचारणा
या चोऱ्यांविषयी तक्रार करण्यासाठी शेतकरी यावल पोलीस ठाण्यात जातात, मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी उलट तक्रारदार शेतकऱ्यांवरच प्रश्नांची सरबत्ती केली जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकरी तक्रार करण्यास धजावत नाहीत आणि चोरट्यांचे फावते आहे.
शेतकरी म्हणतात, "शेतातल्या पिकांचे नियोजन आणि चोऱ्यांचा बंदोबस्त दोन्ही आमच्यावर आले आहेत. पोलिसांनी जर वेळेवर कारवाई केली असती, तर या घटना थांबू शकल्या असत्या." आता पोलीस निरीक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवारातील चोऱ्यांचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकरी करत आहेत.