जे. डी. बंगाळे मंडळ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा.
NEET परीक्षा ही भारतातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे. यात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अनेकजण दोन-दोन वर्षे रात्रंदिवस अभ्यास करतात. या काळात त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींपासून दूर राहावे लागते, सामाजिक संबंध कमी होतात आणि सतत एक तणावपूर्ण वातावरण अनुभवावे लागते. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागतात.
फक्त मानसिकताच नव्हे, तर शारीरिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो. अभ्यासाच्या ओझ्याखाली अनेक विद्यार्थी अनियमित जीवनशैली जगतात. वेळेवर न जेवणे, पुरेशी झोप न घेणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांवर ताण येणे, पाठदुखी, बैठी जीवनशैलीमुळे होणारे आजार असे अनेक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावे लागतात.
या परिस्थितीत आणखी गंभीर बाब म्हणजे अनेक विद्यार्थी केवळ त्यांच्या पालकांच्या इच्छेसाठी NEET ची तयारी करतात. त्यांना स्वतःला डॉक्टर व्हायचे नसते, परंतु कुटुंबाच्या दबावामुळे ते या स्पर्धेत उतरतात. अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आणखीनच त्रासदायक ठरते. त्यांची आवड नसतानाही त्यांना तोच अभ्यासक्रम आणि तीच स्पर्धा स्वीकारावी लागते. यामुळे त्यांच्यात एक प्रकारची घुसमट आणि असंतोष निर्माण होतो.
पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करणे स्वाभाविक आहे. चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांनी यशस्वी व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. परंतु अनेकदा ही इच्छा हट्टात बदलते. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. 'माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे' किंवा 'आमच्या खानदानात सगळे डॉक्टर आहेत, तूही डॉक्टरच व्हायला पाहिजे' अशा आग्रहांमुळे मुलांवर अनावश्यक दबाव येतो.
मुलांची आवड, त्यांची क्षमता आणि त्यांची स्वप्ने यांचा विचार करणे पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक मूल वेगळे असते आणि प्रत्येकाची स्वतःची अशी क्षमता आणि आवड असते. केवळ पालकांच्या हट्टामुळे मुलांना अशा खडतर परीक्षेत ढकलणे त्यांच्या भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
अनेकदा NEET मध्ये अपयश आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निराशा आणि आत्मविश्वासाची कमतरता येते. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा केवळ पालकांच्या दबावामुळे दिली, त्यांना तर या अपयशाचा अधिक त्रास होतो, कारण त्यांची स्वतःची कोणतीच भावनिक गुंतवणूक त्यात नसते.
त्यामुळे, NEET परीक्षा नक्कीच अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्याचे माध्यम असू शकते. परंतु, ज्या विद्यार्थ्यांवर केवळ पालकांच्या आग्रहामुळे ही परीक्षा देण्याची वेळ येते, त्यांच्यासाठी ती खऱ्या अर्थाने 'सेहत के लिये हानिकारक' ठरते. पालकांनी आपल्या मुलांच्या भावनांचा आदर करावा, त्यांच्या आवडीनिवडींना महत्त्व द्यावे आणि त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार करिअर निवडण्याची संधी द्यावी, हेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहे.04.05.2025