यावल न्युज
यावल, दि. ४ – तालुक्यातील हिंगोणा गावाजवळील बोरखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक ३ रोजी रात्री काशिनाथ राणे यांच्या शेतात बारेला कुटुंब वास्तव्यास आहे. रात्रीच्या सुमारास त्यांच्या बकऱ्यांचे जोरजोरात ओरडण्याचे आवाज आल्याने त्यांनी बाहेर पाहिले असता, एक बिबट्या त्यांच्या बकरीला ओढत नेत असल्याचे दिसून आले.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी घरातच आसरा घेतला. सकाळी पाहणी केली असता, बकरीचा फाळशा पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोणा आणि भोवतालच्या परिसरात याआधीही बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्याच्या घटना घडल्या असून, शेतकरी आणि शेतमजूर यामध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. अनेकजण रात्रपाळीची शेतीकामे टाळत असून, सकाळी व संध्याकाळी शेतात जाण्यास देखील भीती वाटू लागली आहे.
वन विभागाकडे मागणी
या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून वन विभागाकडे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, पिंजरा लावावा, तसेच परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वेळेवर योग्य उपाययोजना न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.