यावल न्युज
यावलः रावेर-यावल तालुक्यातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सहज व सोयीस्कर पद्धतीने मिळावा, यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकतीच प्रशासनाला सूचना दिल्या की आधार व्हेरिफिकेशन आणि हयातीचे दाखले (Life Certificate) यांसारख्या आवश्यक सेवा आता ग्रामपंचायत कार्यालये, सीएससी केंद्रे किंवा मोबाईल कॅम्पच्या माध्यमातून थेट गावातच उपलब्ध करून द्याव्यात.
सध्या या सेवा प्रामुख्याने तहसील कार्यालयांमध्येच मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषतः वृद्ध, अपंग आणि अशक्त व्यक्तींना वारंवार प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ, आर्थिक खर्च आणि शारीरिक त्रास वाढतो.
या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी रावेर तहसील कार्यालयातून व्हिडिओ कॉलद्वारे विविध लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गाव पातळीवर सेवा देण्याचे निर्देश दिले.
त्याचबरोबर या उपक्रमाची प्रभावी जनजागृती व्हावी जेणेकरून अधिकाधिक नागरिक लाभ घेऊ शकतील, यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असे त्यांनी सुचवले आहे. हा निर्णय ग्रामीण भागातील जनतेसाठी एक मोठा दिलासा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.