यावल न्युज
यावल तालुक्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी पेरणीपूर्व शेती नियोजन संदर्भात आज आयोजित बैठकीत शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने समोर आला. चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक तहसील कार्यालयात पार पडली.
बैठकीत शेतकऱ्यांनी बोगस बियाणे, पेरणी संबंधित अडचणी आणि योजनांच्या अंमलबजावणीतील गोंधळाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. मात्र तालुका कृषी अधिकारी भरत वारे आणि त्यांच्या विभागाचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देण्यात अपयशी ठरले. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
आ. अमोल जावळे यांनी संतप्त होत विचारले, "शेतकरी योजनांची माहिती जर तालुका कृषी अधिकाऱ्यांनाच नसेल, तर मग शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे?" तसेच आ. चंद्रकांत सोनवणे यांनीही कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली.
या बैठकीस फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना करणे आणि कृषी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे ही या बैठकीची मुख्य मागणी ठरली.