यावल न्युज
तालुक्यातील पाडळसे गावातील गौशाळा परिसरातील माती वाहतुकीच्या वादामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच सौ. गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता सावदा येथील व्यक्तीस माती नेण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.
गावातील तरुण गोविंदा संजय कोळी यांनी सदर माहिती गावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्यानंतर परिस्थिती चिघळली. या प्रकारावरून चिडलेल्या सरपंच पती सुरज मनोहर पाटील यांनी गोविंदा यांना दारूच्या नशेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गोविंदाने केला असून, त्यांनी फैजपूर तालुका यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सुरज पाटील यांनी देखील गोविंदा कोळी यांनीच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत प्रत्युत्तरात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता परस्पर आरोप-प्रत्यारोपात अडकले आहे.
या वादामुळे गावात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. काही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पारदर्शक व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले की, "ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता नसेल, ठराव आणि ग्रामसभेचा अवमान होईल, व त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमक्या दिल्या जातील तर गावाचा विकास ठप्प होईल."
गावातील उपसरपंच अलकाबाई कोळी, सदस्य पुनम पाटील, तुषार भोई, सुदेश बाविस्कर व पांडुरंग कोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असा आरोप केला आहे की, "सरपंच पती सुरज पाटील हे दारूच्या नशेत ग्रामपंचायतीच्या कामात वारंवार हस्तक्षेप करतात आणि पत्नीच्या पदाचा गैरवापर करत आहेत."
सध्या पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी सुरू केली असून पुढील तपासासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. गावकऱ्यांनी संयम राखावा व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.