यावल न्युज चुंचाळे: सुपडु संदानशीव
धानोरा ता चोपडा : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर (NH) धानोरा गावाजवळ गेल्या वीस दिवसांपासून पडून असलेल्या मोठ्या वृक्षामुळे शनिवारी रात्री दुर्दैवी घटना घडली. धानोरा येथील रहिवासी व बिडगाव विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक एस.पी. महाजन (वय ६२) यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रीय रस्ते सुरक्षा विभागाच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
दि. ६ मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे धानोरा परिसरात अनेक झाडे कोसळली होती. त्याच दिवशी चिंचोली मार्गावर भोकरजातीचे एक मोठे झाड महामार्गावर कोसळले होते. ते झाड रस्त्याच्या मध्यभागी पडलेले असून, यामुळे वाहनचालकांना सातत्याने अडथळा निर्माण होत होता. मात्र, NH विभागाने याकडे दुर्लक्ष करून झाड हटवण्याची कोणतीही कार्यवाही केली नाही.
शनिवारी रात्री १० वाजता एस.पी. महाजन हे चिंचोलीहून मोटारसायकलवरून आपल्या घरी धानोरा येथे येत असताना, रस्त्यावर पडलेल्या झाडाला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील शवविच्छेदनासाठी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
एस.पी. महाजन हे राज्यस्तरीय खो-खो पंच तसेच धानोरा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी व जावई असा परिवार आहे. रविवारी दुपारी दोन वाजता धानोरा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अपघातानंतर गावकऱ्यांत आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ‘महामार्गावर इतक्या दिवसांपासून झाड पडून असूनदेखील NH विभागाने दुर्लक्ष का केले?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचे आधारवड हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.