बोगस बांधकाम कामगार नोंदणी विरोधात CITU चे आंदोलन

यावल न्युज : जळगाव प्रतिनिधी

सहाय्यक बांधकामगार आयुक्त कार्यालयाकडून बांधकामगार आणि घरेलू कामगारांच्या बोगस नोंदणीला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप करत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट कार्यालयासमोर सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) जळगाव जिल्हा समितीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजी करत भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यात आला.
CITU चे नेते विजय पवार यांनी सांगितले की, खऱ्या कामगारांची दुर्लक्ष करून असे लोक बांधकामगार म्हणून नोंदणी करत आहेत, ज्यांनी कधी सिमेंट, वीट, रेती उचललेलीही नाही. दोन-दोन हजार रुपये घेऊन बोगस नोंदणी केली जात आहे. कार्यालय भ्रष्टाचाराचे अड्डे बनले असून दलालांचा मुक्तसंचार सुरू आहे. काही महिला चार चार तोडे सोने घालून व कारमधून येत असूनही त्यांना कामगार म्हणून नोंदले जात आहे.

विजय पवार यांनी मागणी केली की, अशा बोगस नोंदण्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात आणि ज्या मक्तेदारांनी खोटे प्रमाणपत्र दिले आहे, त्यांच्यावर कारवाई करून त्यांची नोंदणीही रद्द करण्यात यावी. अन्यथा पुढील टप्प्यात सहाय्यक बांधकामगार आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात CITUचे विविध पदाधिकारी, बांधकाम महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांचा रोष पाहता प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने