यावल : वाडी, वस्ती आणि पाडा यांना महसुली गावाचा दर्जा देण्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी यावल तहसील कार्यालयाला यावर्षीचा "उत्कृष्ट तहसील कार्यालय" पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, आमदार राजू मामा भोळे आणि आमदार पाचोरा किशोर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी अतुल बडगुजर, तसेच तलाठी मनीषा बारेला, कुर्शाद तडवी आणि अव्वल कारकून निशा चव्हाण यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
तसेच, इ-चावडी वसुली अंतर्गत साझाची संपूर्ण वसुली पूर्ण करणारे आणि तीन लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल वसूल करणारे यावल तालुक्यातील दोन तलाठी — भूषण सूर्यवंशी आणि गजानन पाटील यांना देखील विशेष पुरस्कार देण्यात आला.
या गौरवामुळे यावल तहसील कार्यालयाची कामगिरी राज्यपातळीवर उठून दिसली असून, महसूल विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता व कार्यक्षमतेचे हे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.