आमदार अमोल जावळे यांची यावल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट – नागरिकांच्या समस्या ऐकून त्वरित उपाययोजना

यावल : यावलमधील ग्रामीण रुग्णालयाला आज आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात रुग्णालयातील अनेक मूलभूत समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. विशेषतः अस्वच्छता, बंद अवस्थेतील एक्स-रे मशीन, पिण्याच्या पाण्याचा अभाव, तसेच डेंटल डॉक्टर नियमितपणे उपस्थित नसणे या गंभीर बाबी आमदारांच्या निरीक्षणात आल्या.
यावेळी आमदार जावळे यांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी थेट संवाद साधला. रुग्णांच्या तक्रारी ऐकून त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने योग्य त्या सुविधा पुरवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. “नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


रुग्णालयात नुकतेच आलेले नवीन बेड व वैद्यकीय साहित्य त्वरित वापरात आणण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत सोनवणे यांनी आमदारांना सध्याची परिस्थिती आणि अडचणींची माहिती दिली.


आमदार जावळे यांच्या या अचानक भेटीमुळे रुग्णांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. त्यांच्या थेट संवादातून नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. उपस्थित नागरिकांनी आमदारांच्या या सक्रिय सहभागाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
या पाहणीवेळी डॉ. कुंदन फेगडे, राहुल बारी, पराग सराफ, बाळू फेगडे, कोमल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने