यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील दानशूर कुटुंबाने सामाजिक बांधिलकीतून उपलब्ध करून दिलेला स्वर्गरथ आज खिळखिळा झाल्याने शेवटच्या घटकांवर पोहोचला आहे. अंत्यविधीच्या वेळी मृतदेह नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेला हा स्वर्गरथ सध्या उपेक्षेच्या गर्तेत सापडला आहे. त्याच्या दुरुस्तीची गरज असूनही स्थानिक प्रशासन वा ग्रामपंचायतीकडून कुठलीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत, ही बाब ग्रामस्थांच्या तीव्र नाराजीचे कारण ठरत आहे.
गावापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीकडे अंत्ययात्रेसाठी पूर्वी नागरिकांना चालत जावे लागत होते. या त्रासाला ओळखून कै. प्रभाकर गाजरे आणि मिलिंद गाजरे यांच्या स्मरणार्थ लिलाबाई गाजरे यांनी स्वखर्चातून एक स्वर्गरथ गावासाठी देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिला होता. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी त्यावेळी मनापासून स्वागत केले होते. हा स्वर्गरथ हिंगोणा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आला होता.
मात्र, काहीच वर्षांत या रथाची दुरवस्था झाली आहे. सततच्या वापरामुळे तडे गेले असून चाके, छत, आणि लोखंडी सांगाडा कमकुवत झाला आहे. एकाच ठिकाणी पडून असल्याने त्याची अवस्था आणखी खराब होत चालली आहे. कोणत्याही क्षणी वापरण्यायोग्य न राहण्याच्या स्थितीमध्ये हा रथ सध्या आहे.
अंत्ययात्रेसाठी हे वाहन अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "दानशूर कुटुंबाने समाजाच्या हितासाठी हा रथ दिला, पण त्याची अशी उपेक्षा होणं हे दुर्दैव आहे," असे ग्रामस्थ सांगत आहेत.
लवकरात लवकर या स्वर्गरथाची दुरुस्ती करून तो पूर्ववत कार्यक्षम करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी हिंगोणा ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.