यावल : तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याला असलेल्या पाड्यांमध्ये आणि शेतशिवारात बिबट्याचे दर्शन ही आता नित्याची बाब झाली आहे. दोन निरागस बालकांचा जीव घेणारा बिबट्या पकडण्यात आला खरा, पण त्यानंतरही परिसरात भीतीचे सावट हटत नसल्याने अनेकांना एकच प्रश्न सतावत आहे – "खरा हल्लेखोर अजून मोकाट तर नाही ना?"
१६ मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत मोहराळा, दहिगाव, जामुनझिरा या भागांमध्ये शेतकरी आणि स्थानिकांना पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे, दहिगाव शिवारात २३ मार्च रोजी माजी पंचायत सदस्य शेखर पाटील यांनी स्वतः त्यांच्या शेताजवळ बिबट्याला पाहिलं होतं. त्यांच्या मते, त्यांनी पाहिलेला बिबट्या नुकताच पकडलेला बिबट्या नव्हता – तो तर वयानेही लहान वाटत होता. हे वक्तव्य केवळ शंका नाही तर गंभीर इशारा बनून समोर येत आहे.
अशा परिस्थितीत वन विभागाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यापूर्वी साखळी माणकी शिवारात केशा पावरा या आदिवासी बालकावर झालेल्या हल्ल्यानंतरही विभागाने पुरेशी दक्षता घेतली नव्हती. त्याचप्रमाणे, परवा झालेल्या घटनेनंतर आठ तासांत बिबट्या परत येण्याची शक्यता असताना सुद्धा योग्य ती कारवाई झाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यांनी हादरला यावल तालुका – हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद
सध्या मकी आणि कांदा काढणीसारखी अत्यंत महत्त्वाची शेतीकामे सुरू आहेत. मात्र, या बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी आणि मजूर कामावर जाण्यासही घाबरत आहेत. संपूर्ण शेती व्यवस्था धोक्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आता थेट मागणी केली आहे की, वन विभागाने दुसऱ्या बिबट्याच्या शोधासाठी तातडीने सापळे, ट्रॅप कॅमेरे आणि गस्त वाढवावी. शेखर पाटील यांचे निरीक्षण अधिक स्पष्ट आहे – "मी पाहिलेला बिबट्या कमी वयाचा होता. त्यामुळे अजून एक बिबट्या नक्कीच मोकाट आहे."
यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी वन विभागाला झापल्याशिवाय पहिला बिबट्याही पकडला गेला नसता, असा शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आता पुन्हा अशाच झापडीतूनच विभाग कामाला लागेल का, अशी चीडही शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
हल्लेखोर बिबट्याचा रहस्य आजही उलगडलेले नाही… आणि तो मोकाटच असेल, तर पुढचा बळी कोणाचा?
वाचकहो, सावध रहा – कारण ही गोष्ट इथे संपलेली नाही!