यावल : यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात चोपडा विधानसभेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत असताना आमदार सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
विशेषतः घरकुल विभागातील दोन वर्षांपासून मंजूर झालेल्या प्रकरणांचे चेक अद्याप वितरित न झाल्याच्या तक्रारींवरून संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने चेक अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, प्रलंबित गोठा प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देशही दिले.
दरम्यान, "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" उपक्रमांतर्गत तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक : जिल्हा परिषद शाळा, शिरसाड साकळी (₹३ लाखांचे बक्षीस)
द्वितीय क्रमांक : पीएम शाळा, दहीगाव (₹२ लाखांचे बक्षीस)
तृतीय क्रमांक : उर्दू शाळा, किनगाव (₹१ लाखांचे बक्षीस)
या प्रसंगी सूर्यभान पाटील, भरत चौधरी, मुन्ना पाटील, बबलू कोळी, सुभाष साळुंखे, अविनाश पाटील, लक्ष्मण बडगुजर, प्रमोद सोनवणे, दिनू माळी, विनायक पाटील, विनोद खेवलकर यांच्यासह तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी धनके, वनविभाग व विद्युत कंपनीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.