यावल : यावल तहसील कार्यालय परिसरातील गेली पाच वर्षे बंद अवस्थेत असलेला बोरवेल अखेर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रयत्नातून पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. तहसील कार्यालयातील पाणीटंचाईची समस्या यामुळे सुटण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी नायब तहसीलदार संतोष विनंते यांचे देखील विशेष योगदान राहिले. आवश्यक यंत्रसामग्री व कामकाजाची आखणी यामध्ये मोलाची भूमिका बजावली. सुरुवातीला बोरवेलच्या खराबीमुळे अनेक अडचणी आल्या होत्या, मात्र तहसीलदार नाझीरकर यांच्या प्रयत्नांनी आवश्यक दुरुस्ती, सफाई व जलवाहिनीचे काम पूर्णत्वास नेले गेले.
या बोरवेलच्या पुनरुज्जीवनामुळे तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवर्ग व शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आता शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाबद्दल यावल तालुक्यात समाधान व्यक्त होत असून तहसील कार्यालयाने वेळोवेळी अशी सकारात्मक पावले उचलावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.