यावल : यावल तालुक्यातील मनवेल आणि डांभुर्णी गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या दोन बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये अशा एकूण ५० लाख रुपयांची आर्थिक मदत चोपडा-यावल मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
सेवा हक्क दिनानिमित्त यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी तसेच वनपाल विपुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिनांक ६ मार्च रोजी मनवेल येथे ७ वर्षीय केशव बारेला तर दिनांक १५ एप्रिल रोजी डांभुर्णी येथे २ वर्षीय रत्नाबाई ठेलारी यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून पीडित कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळवून दिली.