डोंगर कठोरा मोहाळी शिवारात शेतकऱ्याला बिबट्याचे थेट दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

यावल : तालुक्यातील डोंगर कठोरा येथील मोहाळी शिवारात एका शेतकऱ्याला दोन बिबट्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (दि. २४ एप्रिल) सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
शेतकरी मनोहर बळीराम पाटील नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणी भरत असताना, त्यांना एका बोकडावर हल्ला झाल्याचे दिसून आले. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत मागे सरकतानाच त्यांच्या पायावर बिबट्याचे एक लहान पिल्लू येऊन पडले. पायावर बिबट्याचा स्पर्श झाल्याने मनोहर पाटील जमिनीवर कोसळले व त्यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केली. त्यांच्या समोर लगेचच दुसरी मोठी मादी बिबट्या उभी राहिली.

जीवाच्या भीतीने पाटील यांनी माती फेकत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरडाओरडाने त्यांच्या पत्नी व इतर शेतकरी धावत आले, त्यामुळे बिबट्यांचे मादी व पिल्लू जंगलात पळून गेले आणि मनोहर पाटील यांचा जीव वाचला.

सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल स्वनिल फटांगरे यांच्या माहितीनुसार, या भागात पिंजरे लावण्यात आले असून कॅमेऱ्यांच्या मदतीने बिबट्यांवर निगराणी ठेवली जात आहे. बोकडावर हल्ला करणारे बिबटे हे डोंगरदा येथील मेंढपाळ ठाकूर पावरा यांचा बोकड असल्याचे समजते.

घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्यांना तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने