हिंगोणा (ता. यावल) – मुख्यमंत्री पेयजल योजनेतून हिंगोणा गावात मंजूर झालेल्या एक लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम गेली सहा वर्षे रखडलेले आहे. ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही काम कासवगतीने सुरु आहे. गावातील ४०-४५ वर्षे जुने जलकुंभ निकामी झाले असून नविन जलकुंभाची तातडीने गरज आहे.
गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनही काम पूर्ण होत नसल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे. जलजीवन योजनेतील दुसरे जलकुंभाचे काम देखील चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे.
गावात उन्हाळ्यात पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत असून, निधी असूनही पाणीटंचाई कायम आहे, हे शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुद्दाम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यावल-रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी या अपूर्ण कामाकडे लक्ष देऊन, काम लवकर पूर्ण करून गावातील पाणीसमस्या दूर करावी अशी जोरदार मागणी होत आहे.