यावल, दि. 28 मे 2026 : यावल तालुक्यातील मुदत संपत आलेल्या 47 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून वॉर्डनिहाय आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये 12 जून रोजी विशेष सभा घेऊन प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून यापूर्वीच वॉर्ड रचना प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आता सदस्य व सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. प्रारूप आरक्षण 19 जून रोजी प्रसिद्ध केले जाणार असून त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 25 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकतींचा निपटारा केल्यानंतर अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण 10 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार बी. एम. पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे व सुयोग पाटील यांच्या उपस्थितीत नियोजन सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
विशेष सभेमध्ये संबंधित वॉर्डातील विविध प्रवर्गांच्या लोकसंख्येच्या आधारे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. या प्रक्रियेमुळे निवडणूक वातावरणाला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, विविध प्रवर्गांसाठी सरपंच पदांचे आरक्षणही निश्चित करण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती राखीव ग्रामपंचायती – वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, हंबर्डी, राजोरे.
अनुसूचित जमाती महिला राखीव – कोरपावली, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द.
अनुसूचित जाती राखीव – किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभुर्णी, निमगाव.
अनुसूचित जाती महिला राखीव – वनोली, दुसखेडे, अंजाळे.
नामाप्र राखीव – भालशीव, हिंगोणे, आमोदे, सातोद, विरावली, नायगाव.
नामाप्र महिला राखीव – दहिगाव, भालोद, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र. सावदा, कोळवद, महेलखेडी.
सर्वसाधारण राखीव – चिंचोली, बोरखेडा बुद्रुक, सावखेडेसीम, पिंपरूड, टाकरखेडे.
सर्वसाधारण महिला राखीव – अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, डोणगाव, नावरे, वढोदे प्र. यावल, बोरावल बुद्रुक, आडगा