हंडा मोर्चाने हिंगोणा ग्रामपंचायत दणाणली

हिंगोणा, ता. यावल : यावल तालुक्यातील हिंगोणा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून वार्ड क्रमांक ३ मध्ये तब्बल १५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
संतप्त महिला व पुरुषांनी हिंगोणा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास अर्धा तास आंदोलकांनी हंडे वाजवत ग्रामपंचायत परिसर दणाणून सोडला.
मात्र, या आंदोलनादरम्यान ग्रामविकास अधिकारी, प्रशासक तसेच ग्रामपंचायतीचा एकही कर्मचारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी न आल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. 

आंदोलकांनी काही वेळ ग्रामपंचायत परिसरात ठिय्या आंदोलन केले. मात्र कोणतीही दखल न घेतल्याने नाराज ग्रामस्थ अखेर घरी परतले.

गावात ग्रामपंचायतीच्या विहिरी व ट्युबवेल अनेक ठिकाणी उपलब्ध असतानाही योग्य पाणी व्यवस्थापनाचे नियोजन नसल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईन लीक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास ग्रामस्थांतर्फे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशपाक तडवी, रऊफ मण्यार, इमरान शेख, शब्बीर शेख, इरफान मन्यार, अकील मन्यार, तनवीर मन्यार, समीर शेख आदींनी दिला. यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने