हिंगोणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ चाकू हल्ला; युवक ठार, तिघे जखमी

यावल प्रतिनिधी :
यावल तालुक्यातील हिंगोणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चाकू हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत प्रथमेश मुकेश महाले (वय अंदाजे २२) यांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन आरोपी यांनी प्रथमेश महाले यांच्या छातीवर व पोटावर धारदार चाकूने वार केले. वार अत्यंत गंभीर असल्याने प्रथमेश यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र छाती व पोटावर गंभीर जखमा झाल्याने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सावदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी करून प्रथमेश महाले यांना मृत घोषित केले. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रीना रोहित गजरे, मोहित राजेंद्र गजरे व निखिल राजेंद्र गजरे हे देखील चाकू हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुढील उपचार जळगाव येथील रुग्णालयात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद फैजपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात येत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, दिवसा ढवळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून नेमके कारण काय, याबाबत तपासानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने