यावल प्रतिनिधी :
ता. यावल येथील मौजे हिंगोणा येथे घडलेल्या धारदार शस्त्र हल्ल्याच्या प्रकरणात मयत प्रथमेश याला न्याय मिळावा तसेच आरोपींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी तहसीलदार यावल यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास हिंगोणा येथे आरोपी गौरव जाधव, सुधीर तायडे, मनोज तायडे व सचिन तायडे यांनी पूर्वनियोजित कट रचून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात प्रथमेश याचा मृत्यू झाला असून मोहित, निखील व रिना हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेचा सूत्रधार मनोज तायडे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून तो मुंबई येथे पोलिस खात्यात कार्यरत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पोलिस खात्यातील संपर्क व पदाचा गैरवापर करून आरोपी तपासावर प्रभाव टाकू शकतात, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या गुन्ह्यात मोक्का (MCOCA) कायदा लागू करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रथमेश याला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.