साकळी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्न

यावल (प्रतिनिधी) :
यावल येथील साकळी मंडळात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” शनिवारी (दि. 14 मार्च) उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे तसेच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुकास्तरीय शासकीय अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ थेट गावपातळीवर देण्यात आला. यामध्ये वारस नोंदींच्या एकूण 112 प्रकरणांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 7 जिवंत सातबारा वाटप करण्यात आले. तसेच उत्पन्न दाखले 9, शिधापत्रिका 9, जात प्रमाणपत्र 11, अधिवास व नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्रे 8, विशेष अर्थसाहाय्य योजनेचे 21 लाभार्थी यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आला.
तसेच तुकडा शेरा कमी करण्याबाबत एकूण 914 सातबारा प्रकरणांपैकी 456 पात्र प्रकरणे नोंदवली गेली असून प्रातिनिधिक स्वरूपात 11 आदेश वितरित करण्यात आले. लक्ष्मी मुक्ती सातबारा 13, आदिवासी खातेदार नोंद 2, अकृषिक सातबारा शेतसारा माफी 22, पुनर्वसन शेरा कमी करणे 8 तसेच घरकुल योजनेअंतर्गत 25 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

आरोग्य विभागामार्फत 11 आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले. तसेच बेबी किट, ट्रॅक्टर यांसह विविध योजनांचे लाभही प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले.

शिबिराच्या ठिकाणी विविध शासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. या शिबिराला सुमारे 900 ते 950 नागरिकांची उपस्थिती नोंदवण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महसूल उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी मानले
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने