सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही;
यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
यावल तालुक्यातील महेलखेडी येथे मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, महेलखेडी येथील रहिवासी नथ्थू निजाम तडवी यांच्या घरी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याने घरातील विविध वस्तू जळून खाक झाल्या. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करून आग आटोक्यात आणली.
घटनेची माहिती मिळताच कोरपावली तलाटी मॅडम आरजू तडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचांसमवेत पाहणी केली. पंचनामा करताना घरातील काही साहित्य जळाल्याचे निदर्शनास आले. यात फुलर, मिक्सर, प्लास्टिक टब, इतर प्लास्टिक व लाकडी वस्तू तसेच धान्य यांचा समावेश असून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पंच म्हणून नामदेव आसाराम सुरकाळे (वय ६५) व महेंद्र सुहास पाटील यांनी पंचनाम्यावर सही केली आहे. तसेच ग्रामसेवक व पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा पूर्ण करण्यात आला.
दरम्यान, घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.