हिंगोणा (ता. यावल) प्रतिनिधी
हिंगोणा येथील हटकर कॉलनीमध्ये सध्या श्रीराम कथा महोत्सव भक्तिभावाने सुरू असून या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्रीराम कथा प्रवक्त्या परमपूज्य सौ. रूपालीताई सवणे यांच्या प्रभावी कथावाचनाने परिसर भक्तिमय झाला आहे.
आज १८ डिसेंबर रोजी या महोत्सवांतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज यांची विशेष कीर्तनसेवा संपन्न होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
हा श्रीराम कथा महोत्सव दिनांक १५ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथावाचन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
या महोत्सवाचा मुख्य उद्देश समाजात धर्मनिष्ठा, सदाचार व आदर्श जीवनमूल्यांचा प्रसार करणे असून रामचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांद्वारे नागरिकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळावे हा आहे. महोत्सवात भक्तिगीत, भजन, रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण तसेच उपस्थित भाविकांसाठी प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हा भक्तिमय सोहळा जय श्री दादाजी मित्र मंडळ, हटकर कॉलनी, हिंगोणा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.