यावल प्रतिनिधी
राज्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून नगराध्यक्ष पदासाठी सौ. छाया अतुल पाटील या महिला उमेदवार रिंगणात असून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे देखील नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान काही विरोधक हे विकासाच्या मुद्यांवर चर्चा न करता जाती-पाती व धर्माच्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत, असा आरोप श्री. पाटील यांनी “दैनिक लोकशाही”शी बोलताना केला.
“मतदार सुज्ञ आहेत, विकासावरच मी मत मागणार”
अतुल पाटील म्हणाले,
“मी १४ महिने ४ दिवस नगराध्यक्षपदावर कार्यरत होतो. त्या काळात माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करून यावल शहराच्या विकासासाठी काम केले. आज मात्र विरोधक विकासाऐवजी जातीय व धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करीत आहेत. परंतु यावल शहरातील मतदार सुज्ञ आहेत. मी विकासाच्या मुद्द्यावरच जनतेकडे मत मागणार आहे.”
यावलमध्ये रंगतदार लढत
यावलमध्ये यंदा नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पक्षीय समीकरणे, स्थानिक नेतृत्व, तसेच विकासाच्या वचनांचा मुद्दा मतदारांना आकर्षित करीत आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात गेल्याने उमेदवारांकडून मतदारांशी व्यक्तिगत संवाद वाढविण्यात येत आहे.