यावल प्रतिनिधी
येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार आता चुरशीला आला असून सर्वच उमेदवार मतदारांशी डोअर-टू-डोअर संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर यावल नगरपालिकेच्या नगरसेविका पदासाठी प्रभाग क्रमांक २ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. वंदना भुषण फेगडे यांनी आपल्या समर्थकांच्या जोरावर प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत याच प्रभागातून भूषण फेगडे यांनी उमेदवारी लढवली होती. अत्यल्प मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी सामाजिक कार्याला कधीही विराम दिला नाही. त्या चिकाटीच्या जोरावर आणि नागरिकांशी सातत्याने जोडलेले राहून, यंदा त्यांनी आपल्या पत्नी सौ. वंदना फेगडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.
प्रभाग क्रमांक २ मधील प्रचार मोहिमेला सुरुवात करताच आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रोहीणी उमेश फेगडे यांच्या टीमला मिळालेला सर्व समाजघटकांचा पाठिंबा वंदना फेगडे यांच्या बाजूने दिसत आहे. प्रचार दौऱ्यात त्या नागरिकांच्या घरपोच भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलेल्या सार्वजनिक सुविधा, दैनंदिन अडचणी आणि विकासकामांवर वंदना फेगडे यांनी लक्ष केंद्रीत केले असून निवडून आल्यास प्रभागात विविध विकास उपक्रम राबविण्याचे त्यांचे आश्वासन आहे. नागरिकांशी संवाद साधताना “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रभावी प्रतिनिधित्व” हा आपला ध्येयवाक्य असल्याचे त्या सांगत आहेत.