हिंगोणा (ता. यावल) :
गेल्या काही दिवसांपासून यावल तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोणा व परिसरात रविवारीही मुसळधार पाऊस सुरू असून शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी हातबल झाला आहे. एकीकडे आकाशातून पाणी ओसंडून वाहत असताना दुसरीकडे गावात नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
गावातील पाणीपुरवठा योजना विहिरी आणि ट्यूबवेलमध्ये भरपूर पाणी असतानाही योग्य नियोजनाच्या अभावामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांआड नळाला पाणी येते, तर काही भागात आठवडाभर नळ कोरडेच असतात.
ग्रामस्थांनी या समस्येबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणताही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “विहिरींमध्ये पाणी असूनही नळ कोरडे का?” असा सवाल नागरिक करत आहेत.
दरम्यान, गावात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पाणीपुरवठा’ हा विषय केंद्रस्थानी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की, “या वेळी मत मागताना नेते कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार?”
प्रस्थापित सत्ताधारी वर्गावर नागरिक नाराजी व्यक्त करत असून, विरोधक ‘पाणी व स्वच्छता’ या मुद्द्यावर आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याची तयारी करत आहेत. गावातील तरुण वर्गातही विकास, रोजगार व सुविधा याबाबत असंतोष दिसून येतो आहे.
ग्रामस्थांच्या मते, “वर्षानुवर्षे आश्वासनं मिळत आहेत, पण सुविधा मिळत नाहीत. राजकारणाच्या खेळात सामान्य जनता भरडली जातेय.”
सध्या पावसामुळे शेतीचे नुकसान, नळाला पाणी नसणे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष – या त्रिसूत्री समस्येमुळे हिंगोण्यातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. आता ग्रामपंचायत व प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहते का, की नेहमीप्रमाणे आश्वासनांवरच सर्व थांबते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.