यावल न्युज : जळगाव, प्रतिनिधी | 7 ऑगस्ट 2025
जळगाव येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” योजनेत झालेल्या आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांप्रकरणी अद्यापही कोणतीही चौकशी किंवा कार्यवाही न झाल्यामुळे, भीम आर्मी भारत एकता मिशन च्या वतीने 15 ऑगस्ट 2025 पासून जळगावमध्ये बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची अधिकृत पूर्वसूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आयु. गणेश भाऊ सपकाळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक 15 जुलै रोजी या प्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि संबंधित अधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त मुंबई (4 ऑगस्ट) आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर (5 ऑगस्ट) यांनाही निवेदने सादर करण्यात आली. मात्र, आज (7 ऑगस्ट) पर्यंत कोणतीही चौकशी किंवा ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे
सकाळी 7:00 वा. - जिल्हा परिषद कार्यालय आवारात धरणे आंदोलनास प्रारंभ
त्यानंतर लाँग मार्च – स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन
पुन्हा जिल्हा परिषद कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहील
मुख्य मागणी :
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व DPM पंकज शिंपी यांच्यावर तत्काळ चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी.
सपकाळे यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन पूर्णतः शांततेच्या मार्गाने होणार असून, जर कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली तर त्याची जबाबदारी संपूर्णतः प्रशासनावर राहील.