यावल न्युज :
हंबर्डी येथील रहिवासी आणि यावलमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत असलेले योगेश्वर उर्फ गणेश रमेश नेमाडे (वय अंदाजे ३७ ) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगोणा परिसरात घडली. ही घटना दिनांक २५ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोर कॉलनी जवळ घडली असून, अपघाताचे कारण रस्त्यावर पडलेले झाड असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नेमाडे हे आपले मेकॅनिकचे काम आटपून स्कुटी (मेस्ट्रो, क्र. MH 19 BE 8709)वरून यावलहून हंबर्डी येथे घरी परतत होते. दरम्यान, हिंगोणा जवळील मोर कॉलनी परिसरात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेमुळे हंबर्डी गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. गणेश नेमाडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व वडील असा परिवार असून, घरातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणाचा तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदार वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.