यावल न्युज : पाडळसे ता. यावल
यावल तालुक्यातील पाडळसे येथील श्री महाकालेश्वर मंदिरातर्फे सोमवार, २८ जुलै रोजी श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित भव्य कावड यात्रा भक्तिभावाने व उत्साहात पार पडली. या पवित्र यात्रेत परिसरातील हजारो शिवभक्तांनी सहभाग घेत श्रावण पर्वाची आध्यात्मिक अनुभूती घेतली.
यात्रेची सुरुवात सकाळी लवकरच तापी नदीच्या पवित्र घाटावरून करण्यात आली. कावडधारकांनी जयघोषात जलकलश भरले आणि ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमवत पाडळसेकडे पायी यात्रा सुरू केली. वाटेत ओम साई पेट्रोल पंपचे संचालक श्री. रतन धोंडूशेठ भोई, विजय भोई व अजय भोई यांनी कावडधारकांसाठी पाण्याची, चहा व उपवास फराळाची सोय करून स्वागत केले.
यात्रेदरम्यान संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालेला दिसून आला. कावडधारक पाडळसे गावातील श्री महाकालेश्वर मंदिरात पोहोचताच जलकलशातील पवित्र जलाने भगवान महाकालेश्वराचा जलाभिषेक करण्यात आला. अभिषेकावेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या धार्मिक उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कावड यात्रेमुळे पाडळसे गावाच्या धार्मिक परंपरेची साक्ष पुन्हा एकदा मिळाली असून भाविकांना एक आगळा आध्यात्मिक अनुभव लाभला.