दहिगावचे 'प्रति पंढरपूर' श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त अकरा क्विंटल फराळ वाटप

यावल न्युज : जिवन चौधरी
यावल तालुक्यातील दहिगाव येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे अकरा क्विंटल साबुदाणा फराळाचे व तसेच विविध सेवाभावी संस्थांमार्फत केळी व चहा वाटपाचे आयोजन.
या मंदिराचा इतिहास दीडशे वर्षांपेक्षा अधिक असून सन 1998 मध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्चून भव्य मंदिर उभारण्यात आले. या मंदिरास 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीला दरवर्षीप्रमाणे यात्रोत्सव पार पडतो, ज्यामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यावल तालुक्यासह परिसरातील अनेक गावे व भक्त मंडळी येथे दिवसभर भजन, भारुडे म्हणत भावपूर्ण वातावरण निर्माण करतात.

मंदिर उभारणीसाठी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज महाजन, कै. धागो पाटील, प्रकाश सोनार, आत्माराम महाजन यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांनी आर्थिक व श्रमदानातून मोलाचे योगदान दिले आहे.

यंदा पूजाअर्चा सकाळी पाच वाजता सुरू होणार असून होम पूजन नवविवाहित जोडपे – संगीता तुषार माळी, धनश्री गौरव पाटील, दिपाली अक्षय रत्नपारखी, सपना अविनाश पाटील, आश्विनी सचिन मगरे, निकिता मयूर पवार – यांच्या हस्ते होणार आहे.

मंदिराची आकर्षक सजावट सागर चौधरी, बंटी पाटील, शैलेंद्र पाटील व ट्रस्टचे सचिव कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने काही संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहेत.

सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील व हरिभक्त परायण भजनी मंडळी, दहिगाव यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने