मोर नदीपात्रात लक्झरी बस उलटली; २५ प्रवासी जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक

यावल न्युज

– आमोदा गावाजवळ भीषण अपघात; ग्रामस्थ आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले

यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ रविवारी (ता. ६ जुलै) सकाळी भीषण अपघात घडला. मोर नदीवरील पुलावरून एक लक्झरी बस थेट नदीपात्रात कोसळल्याने बसमधील सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमपी ०९ ९००९ क्रमांकाची लक्झरी बस इंदूरहून भुसावळकडे येत होती. पहाटे सुमारे सहा वाजेच्या सुमारास बस मोर नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट पुलावरून खाली नदीपात्रात कोसळली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलीस तसेच आमोदा परिसरातील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवले. अपघाताची नोंद फैजपूर पोलीस स्थानकात सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मोर नदीवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही या भागात अपघात घडले असून स्थानिकांनी या पुलावर आवश्यक सुरक्षाव्यवस्था आणि दुरुस्तीची मागणी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने