फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी

यावल न्युज
फैजपूर, ता. 20 जुलै – फैजपूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते निलेश उर्फ पिंटू राणे यांना यावल व रावेर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालयांमधील शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक 19 जुलै रोजी जारी केला आहे.
ही कारवाई 16 जुलै रोजी फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात निलेश राणे यांनी केलेल्या असभ्य वर्तनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. या घटनेनंतर महसूल विभागात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि महसूल कर्मचाऱ्यांनी फैजपूर व यावल तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले होते. संबंधित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कठोर कार्यवाहीची मागणी केली होती.

त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश काढत निलेश मुरलीधर राणे, रा. फैजपूर, यांना दिनांक 19 जुलै ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मुख्यालये आणि यावल व रावेर तालुक्यांतील शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश बंदी लागू केली आहे.

या आदेशानुसार, या काळात राणे यांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा किंवा ऑनलाईन सुनावणीत सहभागी होण्याचा अधिकार असेल. तसेच, जर त्यांना निवडणुकीसाठी अर्ज सादर करावयाचा असेल, तर त्या प्रक्रियेसाठी एक तासाची विशेष मुभा दिली जाईल.
हा आदेश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने